या वर्षीचा ८मार्च मी नाटकाचा प्रयोग करून साजरा केला.
खरंतर हे काम मला २००९ मध्ये करायचं होतं, पण अनेक अडचणींमुळे ते शक्य झालं नव्हतं! गेल्या वर्षी ४ एप्रिल ला मी माझ्या नाटकाचे प्रयोग सुरू केले होते तेव्हापासूनच्या अनेक आठवणींना मनात उजाळा मिळाला. गेल्या वर्षभरात माझा जनसंपर्क खूपच मोठ्या प्रमाणात वाढला... अनेक इंटरेस्टिंग माणसांच्या ओळखी झाल्या. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी मिळाली...अर्थातच त्याचे काही चांगले आणि काही वाईट परिणामदेखिल झाले.
चांगल्या परिणामांबद्दल बोलायचं तर - इंग्रजी वृत्तपत्रांमधल्या लेखांमुळे अनेक मराठी माणसांनी नाटकाला "सिरीअसली" घेतलं! लोकसत्ता मधल्या शुभदा चौकर यांच्या लेखामुळे अनेक महिलांचे या नाटकाबद्दल कुतूहल जागे झाले. अगदी परवाच्या प्रयोगात देखिल अनेकजणींनी त्या लेखाची आठवण काढली. लोकप्रभातील शिरीषकणेकरांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया आवडल्याची पत्रे मला अजूनही येत असतात. या लेखामुळे देशोदेशीच्या मराठी माणसांशी संपर्क आला. त्यांना मराठी मुलूखातल्या घडामोडींची किती उत्सुकता वाटते त्याची झलक मिळाली . . . या सगळ्यात जास्त आनंद झाला तो नाटक करण्यापूर्वीचा माझा अंदाज खरा ठरल्याबद्दल! नाटाकाच्या पहिल्या प्रयोगापूर्वी अनेकांना माझी काळजी वाटत होती, काहींना भिती वाटत होती - पण मला मनापासून विश्वास वाटत होता की या नाटकाचा आशय समजून घेण्याची किमान मुंबईतल्या मराठी प्रेक्षकांच्या मनाची नक्कीच तयारी आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवला आहे.
सुरुवतीला मी तिकिटे नसलेले प्रयोग केले. ठाण्याला एका डॉक्टरांच्या घरी, एका म्युनिसिपल ऑफिसच्या बोर्डरूम मध्ये, कम्युनिटी हॉल्स मध्ये हे प्रयोग होत असत. . . लोक प्रयोग संपल्यावर आपापल्या मर्जीनुसार टोपीमध्ये पैसे टाकत असत. अनेकदा जाण्यायेण्याचा खर्च देखिल त्यातून निघत नसे. तरीही संस्था आणि संघटना यांच्याशी जोडलेल्या व्यक्तींसमोर एकप्रकारे सुरक्षित वातावरणात हे प्रयोग होत होते.
पण कायमस्वरूपी सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाल्यावर नोव्हेंबर मध्ये मी तिकिट लावून प्रयोग सुरू केले. तेव्हा माझ्या मनात किंचित भीती होती, पण या प्रयोगांनाही जो घवघवीत प्रतिसाद मिळाला त्यामुळे तर उरलीसुरली भिती देखिल निघून गेली. हिंदी- इंग्रजी प्रयोगांपेक्षा अगदी निराळीच ट्रीटमेंट नाटकाला मी दिली आहे; तीदेखिल लोकांना आवडली याचं समाधान वाटतं!
पण या सगळ्या आनंदाला आणि समाधानाला एक द्वेषाची किनार आहेच! या नाटकामध्ये माझी भरपूर भावनिक आणि आर्थिक शक्ती गुंतली गेलेली आहे. हे नाटक करण्यासाठी मी भरपूर जोखीम घेतली आहे याची अनेकांना जाणीवच नसते. कदाचित म्हणूनच नाटकामुळे मला मिळालेल्या प्रसिद्धी बद्दल आणि किंचितशा पैशांबद्दल अनेकांना राग आहे. दुर्दैवाने स्वत:ला "नाट्यक्षेत्रातील" म्हणवणारी अनेक मंडळीदेखिल यात असतात! ही माणसे काही ना काही कुरापती काढून कटकटी करीत रहातात.
पण या माणसांमुळे मी काही मूलभूत महत्त्वाचे धडे शिकले आहे. त्याबद्दल पुढच्यावेळी....!
No comments:
Post a Comment