Monday, May 3, 2010

गेल्या दोन महिन्यात....




जवळजवळ दोन महिन्यांनी पोस्ट लिहि्ते आहे. एकतर इंटरनेटचे कनेक्शन नव्हते आणि मुख्य म्हणजे प्रयोगांमुळे वेळ झाला नाही. नव्या टीममध्ये सर्वांचे सूर छान जुळलेले आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद फारच उत्तम आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात नाटकाचे भरपूर प्रयोग झाले.
हे
नाटक समाजाच्या विविध स्तरातल्या लोकांपर्यंत पोचावे अशी माझी ईच्छा होती, ती खऱ्या अर्थाने सफल होते आहे. गेल्या दोन महिन्यात पु.ल.देशपांडे-मिनी थिएटर या नेहमीच्या जागेसोबतच TISS चे कन्वेन्शन सेंटर, रविंद्र नाट्य मंदीर, यशवंत नाट्यगृह (माटुंगा) आणि दिनानाथ नाट्यगृह(विलेपार्ले) अशा विविध ठिकाणी प्रयोग करता आले. आणि सर्व ठिकाणी तितक्याच विविध प्रकारच्या प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला ह्याचा मनापासून आनंद होतो आहे!
समन्वय संस्थेने आणि TISS च्या special cell for women यांनी आयोजित केलेल्या प्रयोगांमुळे अनेक मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहोचता आले. उर्मिला पवार,डॉ.विठ्ठल प्रभू,डॉ. राजन भोसले, हरीश सदानी यांच्या सारख्यास्त्री-पुरुष समानताआणि लैंगिकता या विषयाशी संबंधित काम करणाऱ्या जाणत्या व्यक्तींकडून पसंतीची पावती मिळणे, कौतुक होणे ह्याचं आम्हाला सर्वांनाच खूप महत्त्व वाटतं! त्याचसोबत अनंतजोग, आरती अंकलीकर, उदय टिकेकर, अनिलगवस, प्रमोद पवार अशा नाट्यक्षेत्रातल्या मंडळींच्या पसंतीमुळेही आमच उत्साह ाअणि आत्मविश्वास प्रयोगागणिक वाढत चालला आहे.
TISS च्या सुंदर ऑडिटोरिअम मध्ये तर देशभरातील निरनिराळ्या राज्यांमधून या विषयांवर काम करणारे कार्यकर्ते आलेले होते. त्याचसोबत मुंबईतील अनेक कार्यकर्ते केवळ नाटक पहाण्यासाठी TISS मध्ये संध्याकाळी खास वेळात वेळ काढून आले होते. सर्वांनी नाटकाचं भरभरून कौतुक तर केलंच ; शिवाय विविध वस्त्यांमध्ये नाटकाचे प्रयोग करण्याविषयी उत्सुकता दाखवली.
मुंबईतल्या
वस्त्यांमध्ये रहाणाऱ्या कष्टकरी वर्गातील महिलांसाठी या नाटकाचे प्रयोग सादर करता यावेत, यासाठी मी बराच काळ पासून प्रयत्न करीत होते.२६एप्रिल ला या प्रयत्नांना यश आलं आणि आस्था परिवार या संस्थेशी जोडलेल्या मुंबईतल्या सभासदांसाठी रवींद्र नाट्य मंदीर मध्येप्रयोग करता आला. ज्यांना नाट्यगृहातलं नाटक पहायची संधी क्वचितच मिळते अशा लोकांसाठी रवींद्र नाट्य मंदिरात प्रयोग आयोजित करता आला याचं मला विशेष समाधान वाटतं! एका वेळी संख्येने जवळजवळ एकहजाराच्या आसपास प्रेक्षकवर्ग लाभण्याचे भाग्य कितीशा प्रायोगिक नाटकांच्या वाट्याला येत असेल?
या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मध्यमवर्गीय आणि वंचितवर्गातील प्रेक्षकांनी एकत्र बसून या प्रयोगाचा आनंद घेतला. आस्था परिवार मधील महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर अशा विविध प्रकारच्या व्यक्ती अगदी मालवणी,भिवंडी, पनवेल, मीरारोड अशा मुंबईआणि आसपासच्या परिसरातून आलेल्या होत्या. विविध पार्ष्वभूमीच्या प्रेक्षकांनी नाटकाला दणकेबाज प्रतिसाद दिला. कष्टकरीवर्गातील प्रेक्षकांच्याही पसंतीला नाटक उतरलं यामुळे मला फार बरं वाटलं! आस्था परिवारशी जोडलेल्या प्रेक्षकांच्या फीडबॅकबद्दल एक खास पोस्ट लवकरच लिहून काढेन. आता आणखी विविध संस्थांना वस्तीवस्तीमधील स्त्रीयांना हे नाटक दाखवायची ईच्छा आहे, आणि आम्हालाही हे प्रयोग करायची उत्सुकता आहे.

No comments:

Post a Comment