Wednesday, June 30, 2010

‘अविस्मरणीय’

‘अविस्मरणीय’ असं विशेषण वापरता येईल असे अगदी मोजके क्षण मी अनुभवले आहेत!गेल्या आठवड्यात धारावीतल्या महिलांसाठी केलेला प्रयोग आणि त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पा - हे मला कधीच विसरता येणार नाहीत.....आमच्या संपूर्ण टीमसाठीच तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
दोनशे बायकांनी भरलेलं पु.ल.देशपांडे अ‍ॅकॅडमीचं मिनी थिएटर - साधारणपणे २० ते ५० वर्ष वयोगटातल्या कष्टकरी बायका आणि मुली - त्यातल्या बहुतेक जणींनी कधी नाट्यगृहात जाऊन नाटक कधी पाहिलेलंच नव्हतं..... धारावीच्या आतल्या भागांमधून त्या खास बसने नाटकाला आल्या होत्या... प्रयोगाआधीच्या त्यांच्या गलबल्यामधून त्यांची उत्सुकता आम्हा कलाकरांपर्यंत पोचत होती.... आपलं नाटक यांना समजेल की नाही , रुचेल की नाही याची आम्हाला देखिल काळजी होतीच.....नाटकाच्या सुरुवातीला आम्ही निवेदन करताना प्रेक्षकांना ‘योनी’ हा शब्द म्हणायला लावतो. . . तिथपासूनच सगळ्यांनी नाटकातल्या खट्याळपणाची मजा घ्यायला सुरुवात केली. आणि मग वाक्यागणिक येणारे उत्स्फूर्त हशे आणि टाळ्या ...यांच्या संगतीने प्रयोग रंगतच गेला.... कितीतरी ठिकाणी त्यांच्या अनावर हसण्यामुळे आम्हाला संवाद थांबवून ठेवावे लागत होते... काही वेळा तर पुढचा प्रवेश सुरू करेपर्यंत सुरू राहिलेल्या हशा आणि टाळ्यांमुळे दोन प्रवेशांमधे असलेलं संगीतदेखिल ऐकू येत नव्हते -

इतका उसळता प्रतिसाद इतक्या जवळून आम्ही कधीच अनुभवलेला नव्हता....मार्च मध्ये रवींद्र नाट्य मंदीरात आस्था परिवार संस्थेशी जोडलेल्या मंडळींसमोर प्रयोग झाला तेव्हा प्रोसिनिअम थिएटरमुळे प्रेक्षक आमच्या पासून तसे लांबच होते. पण आमच्या नाटकाची खरी मजा मीनी थिएटरमध्येच येते. एकेका प्रेक्षकाच्या डॊळ्यात पाहून श्वास- उच्छवासांसहित आपलं म्हणणं पोचवता येतं... ‘या हृदयीचे त्या हृदयी ’ म्हणतात तसं...प्रेक्षकांचे सगळे प्रतिसाद ही कलाकारांना नवी ऊर्जा देत रहातात... एकतर इतका इंटिमेट विषय आणि इंटिमेट ऑडिटोरिअम -आणि इतके उत्सुक प्रेक्षक -
प्रयोगानंतर अनेक जणींनी आम्हाला येऊन मिठ्या मारल्या- "आमच्या मनाच्या आतलंच तुम्ही स्टेजवरून बोलत होता- ते लई भारी वाटलं" इथून प्रतिक्रियांना सुरुवात झाली.... कुणाला बॅंडिट क्वीन सिनेमाची आठवण झाली होती तर कुणाला स्वत:च्या मुलीच्या बाळंतपणाची- हे नाटक खासकरून पुरुषांना दाखवायला पायजे - असं कुणी म्हणत होतं तर मधेच -नाटकाबद्दल मला बोलायचं आहे पण डोअरकीपर काकांना बाहेर जायला सांगा अशी एखादी विनंती येत होती....
नाटकात "चूत" या अपमानकारक शिवीसारख्या शब्दाला आम्ही नवे रूप देतो, त्यावर सगळ्याजणी खूष होत्या,काही जणींना तो शब्द म्हणायची लाज वाटत होती पण सुनीता लाजत लाजत जे म्हणाली ते मात्र सगळ्य़ांनाच पटलं - ती म्हणाली की इतकी वर्ष मी आपल्या त्या जागेकडे "शी,घाण" या दृष्टीनेच पाहिले होते; पण आजमुझे अपनी चूत पर नाझ है!- मग आणखी एक ताई उठून म्हणाल्या ‘ आजवर हा शब्द मी फक्त ऐकला होता पण आता मी हक्कने बोलणार आहे - चूत! ’ ह्या म्हणण्यावर एक जोरदार आरोळी आली- चूत की जय हो! आणि सगळं हॉल ह्या घोषणेने दणाणून गेला... चूत की जय हो! नाटकाचं सार त्यांनी किती थोडक्या शब्दात मांडलं ...आमच्या टीमला ही घोषणा आणि ती देणाऱ्या सगळ्याजणी फारच आवडल्या आहेत.... आता प्रत्येक प्रयोगाच्या आधी आम्ही देखील म्हणणार आहोत - चूत की जय हो!

Monday, June 21, 2010


योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
रविवार २७जून संध्याकाळी ४.
४५ वाजता
रविंद्र नाट्यमंदीर,प्रभादेवी.


मुंबईतला यानंतरचा सर्वांसाठी खुला प्रयोग सप्टेंबर मध्ये

Wednesday, June 16, 2010

पुन्हा एकदा मुंबईच्या वस्त्यांमध्ये रहाणाऱ्या कष्ट्करी महिलांपर्यंत नाटक घेऊन जाण्याची संधी मिळाली आहे. धारावीतील महिलांसाठी ‘जेंडर आणि सेक्शुअ‍ॅलिटी’ या विषयावर एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून "योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" हे नाटक पहाणे आणि त्यावर चर्चा करणे असा कार्यक्रम पु.ल.देशपांडे कला अकादमी च्या मिनी थिएटर मध्ये २९ जून रोजी होणार आहे. हे नाटक त्यांना कोणत्या प्रकारे आणि किती आपलेसे वाटते - हे समजून घ्यायची मला फारच उत्सुकता वाटते आहे.

Monday, June 14, 2010

नाशिकचा प्रयोग अगदी निर्विघ्नपणे पार पडला. नाटकाचा प्रकाशयोजनाकार - विनोद राठोड याने उत्कृष्ट जनसंपर्क केला होता. शिवाय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती आल्या होत्या. रवीवारी दुपारची वेळ असूनही प्रेक्षक अगदी हौसेने नाटकाला आले होते. नाटकानंतर अनेकजणांनी आवर्जून येऊन प्रतिक्रिया पोचवल्या. सर्वांना नाटक आवडलं ह्यामुळे समाधान वाटतंआहे. ‘पुन्हा लवकर प्रयोग करा, आत्ताच्या प्रयोगाची आम्ही माउथ पब्लिसिटी करून ठेवतो ’- असेही प्रेक्षकांनी अगत्याने सांगितले! या सर्वांमुळे आमचा सर्वांचा उत्साह वाढला आहे.
या शिवाय, मी पूर्वी नाशिकला रहात असताना तयार झालेल्या अनेक मैत्रसंबंधांना नव्याने उजाळा मिळाला- हा सर्वात मोठ्ठा बोनस म्हणावा लागेल!

Friday, June 11, 2010

रविवारी १३ जून ला नाशिक मध्ये नाटकाचा प्रयोग आहे. मागच्या वर्षी एकदा अभिवाचनाच्या रूपात निमंत्रितांसाठी या नाटकाचा प्रयोग नाशिक मध्ये केला होता. त्यानंतर हा तिकिट असलेला प्रयोग नाशिकमध्ये प्रथमच होतो आहे. मागच्या वेळी झालेल्या प्रयोगाला खूपच छान प्रतिसाद मिळाला होता - अनेक पत्रकार, लेखकाअणि सामाजिक चळवळीत असलेले लोक प्रेक्षकांत होते. नाटकानंतर श्री.विनायकदादा पाटील यांनी स्त्रीयांच्या लैंगिकतेच्या संदर्भात चक्रधर स्वामींच्या काही ओळी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की- पूर्वीच्या काळी कीर्तनकारांनी जसे जनजागृतीचे काम केले तसेच तुम्ही या नाटकाद्वारे करीत आहात. नाशिकमधल्या प्रेक्षकांनी हे नाटक हसत्याखेळत्या नाटकाच्या रूपात रंगमंचावर आणण्यासाठी खूप प्रोत्साहनदेखिल दिले होते. पण आता या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतोय त्याची थोडिशी काळजी वाटते आहे!
कारण प्रयोगाच्या जाहिरातीला थोडा प्रॉब्लेम आलाय खरा! गावकरी आणि देशदूत या दोन वृत्तपत्रांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या. पण, सकाळने मात्र नाटकाच्या नावात "योनी" हा ब्द असल्याने जाहिरात छापायला नकार दिला होता. मग नाशिकच्या आमच्या मित्राने पुणे सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आमची जुनी जाहिरात दाखवली आणि हा शब्द जाहिरातीत वापरला जाणे त्यांच्या वर्तमानपत्राच्या धोरणाच्या विरुद्ध नाही हे दाखवून दिले- आता उद्या जाहिरात छापली जाईल अशी आशा आहे.
अशा प्रसंगामुळे हे नाटक केले जाण्याची किती गरज आहे- त्याची पुन्हा एकदा जाणीव होत रहाते!
या नाटकाच्या निमित्ताने अनेक विरोधाभासांना सामोरे जावे लागले आहे. कधी त्याची गंमत वाटते तर कधी मनस्तापदेखिल होतो.
नुकतेच मी ‘बाईंडरचे दिवस’ पुस्तकाचा संदर्भ असलेले हिंदी नाटक पाहिले - ‘सेक्स,मोरॅलिटी अ‍ॅन्ड सेन्सॉरशिप’! त्या काळी कमलाकर सारंग यांना आलेल्या अनेक प्रतिकूल अनुभवांचा त्यात उल्लेख आहे. त्यातले ते प्रसंग पाहात असताना मला माझ्या नाटकासंदर्भात आलेले अनुभव आठवत होते. सुदैवाने माझ्या नाटकाला कुठल्याही मूलतत्त्ववादी राजकीय पक्षांनी विरोध केला नाही. मुंबईत तर प्रेक्षकांनी सुरुवातीपासून सकारात्मक प्रतिसाददिलेला आहे. नाशिकचे प्रेक्षक ह्या नाटकाचा स्वीकार करतात की नाही त्याची मला उत्सुकता आहे आणि काळजी देखील!





योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
रविवार दिनांक १३ जून दुपारी १.० वाजता
कालिदास नाट्यमंदीर, नाशिक