Friday, June 11, 2010

रविवारी १३ जून ला नाशिक मध्ये नाटकाचा प्रयोग आहे. मागच्या वर्षी एकदा अभिवाचनाच्या रूपात निमंत्रितांसाठी या नाटकाचा प्रयोग नाशिक मध्ये केला होता. त्यानंतर हा तिकिट असलेला प्रयोग नाशिकमध्ये प्रथमच होतो आहे. मागच्या वेळी झालेल्या प्रयोगाला खूपच छान प्रतिसाद मिळाला होता - अनेक पत्रकार, लेखकाअणि सामाजिक चळवळीत असलेले लोक प्रेक्षकांत होते. नाटकानंतर श्री.विनायकदादा पाटील यांनी स्त्रीयांच्या लैंगिकतेच्या संदर्भात चक्रधर स्वामींच्या काही ओळी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की- पूर्वीच्या काळी कीर्तनकारांनी जसे जनजागृतीचे काम केले तसेच तुम्ही या नाटकाद्वारे करीत आहात. नाशिकमधल्या प्रेक्षकांनी हे नाटक हसत्याखेळत्या नाटकाच्या रूपात रंगमंचावर आणण्यासाठी खूप प्रोत्साहनदेखिल दिले होते. पण आता या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतोय त्याची थोडिशी काळजी वाटते आहे!
कारण प्रयोगाच्या जाहिरातीला थोडा प्रॉब्लेम आलाय खरा! गावकरी आणि देशदूत या दोन वृत्तपत्रांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या. पण, सकाळने मात्र नाटकाच्या नावात "योनी" हा ब्द असल्याने जाहिरात छापायला नकार दिला होता. मग नाशिकच्या आमच्या मित्राने पुणे सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आमची जुनी जाहिरात दाखवली आणि हा शब्द जाहिरातीत वापरला जाणे त्यांच्या वर्तमानपत्राच्या धोरणाच्या विरुद्ध नाही हे दाखवून दिले- आता उद्या जाहिरात छापली जाईल अशी आशा आहे.
अशा प्रसंगामुळे हे नाटक केले जाण्याची किती गरज आहे- त्याची पुन्हा एकदा जाणीव होत रहाते!
या नाटकाच्या निमित्ताने अनेक विरोधाभासांना सामोरे जावे लागले आहे. कधी त्याची गंमत वाटते तर कधी मनस्तापदेखिल होतो.
नुकतेच मी ‘बाईंडरचे दिवस’ पुस्तकाचा संदर्भ असलेले हिंदी नाटक पाहिले - ‘सेक्स,मोरॅलिटी अ‍ॅन्ड सेन्सॉरशिप’! त्या काळी कमलाकर सारंग यांना आलेल्या अनेक प्रतिकूल अनुभवांचा त्यात उल्लेख आहे. त्यातले ते प्रसंग पाहात असताना मला माझ्या नाटकासंदर्भात आलेले अनुभव आठवत होते. सुदैवाने माझ्या नाटकाला कुठल्याही मूलतत्त्ववादी राजकीय पक्षांनी विरोध केला नाही. मुंबईत तर प्रेक्षकांनी सुरुवातीपासून सकारात्मक प्रतिसाददिलेला आहे. नाशिकचे प्रेक्षक ह्या नाटकाचा स्वीकार करतात की नाही त्याची मला उत्सुकता आहे आणि काळजी देखील!





योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
रविवार दिनांक १३ जून दुपारी १.० वाजता
कालिदास नाट्यमंदीर, नाशिक

No comments:

Post a Comment