Wednesday, June 30, 2010

‘अविस्मरणीय’

‘अविस्मरणीय’ असं विशेषण वापरता येईल असे अगदी मोजके क्षण मी अनुभवले आहेत!गेल्या आठवड्यात धारावीतल्या महिलांसाठी केलेला प्रयोग आणि त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पा - हे मला कधीच विसरता येणार नाहीत.....आमच्या संपूर्ण टीमसाठीच तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
दोनशे बायकांनी भरलेलं पु.ल.देशपांडे अ‍ॅकॅडमीचं मिनी थिएटर - साधारणपणे २० ते ५० वर्ष वयोगटातल्या कष्टकरी बायका आणि मुली - त्यातल्या बहुतेक जणींनी कधी नाट्यगृहात जाऊन नाटक कधी पाहिलेलंच नव्हतं..... धारावीच्या आतल्या भागांमधून त्या खास बसने नाटकाला आल्या होत्या... प्रयोगाआधीच्या त्यांच्या गलबल्यामधून त्यांची उत्सुकता आम्हा कलाकरांपर्यंत पोचत होती.... आपलं नाटक यांना समजेल की नाही , रुचेल की नाही याची आम्हाला देखिल काळजी होतीच.....नाटकाच्या सुरुवातीला आम्ही निवेदन करताना प्रेक्षकांना ‘योनी’ हा शब्द म्हणायला लावतो. . . तिथपासूनच सगळ्यांनी नाटकातल्या खट्याळपणाची मजा घ्यायला सुरुवात केली. आणि मग वाक्यागणिक येणारे उत्स्फूर्त हशे आणि टाळ्या ...यांच्या संगतीने प्रयोग रंगतच गेला.... कितीतरी ठिकाणी त्यांच्या अनावर हसण्यामुळे आम्हाला संवाद थांबवून ठेवावे लागत होते... काही वेळा तर पुढचा प्रवेश सुरू करेपर्यंत सुरू राहिलेल्या हशा आणि टाळ्यांमुळे दोन प्रवेशांमधे असलेलं संगीतदेखिल ऐकू येत नव्हते -

इतका उसळता प्रतिसाद इतक्या जवळून आम्ही कधीच अनुभवलेला नव्हता....मार्च मध्ये रवींद्र नाट्य मंदीरात आस्था परिवार संस्थेशी जोडलेल्या मंडळींसमोर प्रयोग झाला तेव्हा प्रोसिनिअम थिएटरमुळे प्रेक्षक आमच्या पासून तसे लांबच होते. पण आमच्या नाटकाची खरी मजा मीनी थिएटरमध्येच येते. एकेका प्रेक्षकाच्या डॊळ्यात पाहून श्वास- उच्छवासांसहित आपलं म्हणणं पोचवता येतं... ‘या हृदयीचे त्या हृदयी ’ म्हणतात तसं...प्रेक्षकांचे सगळे प्रतिसाद ही कलाकारांना नवी ऊर्जा देत रहातात... एकतर इतका इंटिमेट विषय आणि इंटिमेट ऑडिटोरिअम -आणि इतके उत्सुक प्रेक्षक -
प्रयोगानंतर अनेक जणींनी आम्हाला येऊन मिठ्या मारल्या- "आमच्या मनाच्या आतलंच तुम्ही स्टेजवरून बोलत होता- ते लई भारी वाटलं" इथून प्रतिक्रियांना सुरुवात झाली.... कुणाला बॅंडिट क्वीन सिनेमाची आठवण झाली होती तर कुणाला स्वत:च्या मुलीच्या बाळंतपणाची- हे नाटक खासकरून पुरुषांना दाखवायला पायजे - असं कुणी म्हणत होतं तर मधेच -नाटकाबद्दल मला बोलायचं आहे पण डोअरकीपर काकांना बाहेर जायला सांगा अशी एखादी विनंती येत होती....
नाटकात "चूत" या अपमानकारक शिवीसारख्या शब्दाला आम्ही नवे रूप देतो, त्यावर सगळ्याजणी खूष होत्या,काही जणींना तो शब्द म्हणायची लाज वाटत होती पण सुनीता लाजत लाजत जे म्हणाली ते मात्र सगळ्य़ांनाच पटलं - ती म्हणाली की इतकी वर्ष मी आपल्या त्या जागेकडे "शी,घाण" या दृष्टीनेच पाहिले होते; पण आजमुझे अपनी चूत पर नाझ है!- मग आणखी एक ताई उठून म्हणाल्या ‘ आजवर हा शब्द मी फक्त ऐकला होता पण आता मी हक्कने बोलणार आहे - चूत! ’ ह्या म्हणण्यावर एक जोरदार आरोळी आली- चूत की जय हो! आणि सगळं हॉल ह्या घोषणेने दणाणून गेला... चूत की जय हो! नाटकाचं सार त्यांनी किती थोडक्या शब्दात मांडलं ...आमच्या टीमला ही घोषणा आणि ती देणाऱ्या सगळ्याजणी फारच आवडल्या आहेत.... आता प्रत्येक प्रयोगाच्या आधी आम्ही देखील म्हणणार आहोत - चूत की जय हो!

3 comments:

Sumiran Ansh said...

अभिनंदन वंदना

खरच त्या नाटकामध्ये विचार परिवर्तनच नव्हे तर आचार परिवर्तन करण्याची ताकद आहे. खूप चांगलं नाटक मराठी रंगभूमीवर आणल्याबद्दल आभार!!

sagarva said...

Dear Vandana,

Congratulations on another successful performance. Hope to catch one sooner. You have a extraordinary way of connecting with people.Working at the grass roots on a subject as sensitive as this, I reckon, will take a lot more courage than one can imagine.Many, including myself, think and talk about "contributing" to society in "some" way. Very few actually get their hands soiled. "Hail Vandana" :D

Wish you many more successful outings of Yoneechya Maneechya Gujgoshti and many more to come.

Cheers
Sagar

Anonymous said...

चूत की जय हो! ase mhanun nakki kay sadhayache aahe?
what is the aim???

Post a Comment