Tuesday, November 24, 2009

गेल्या दोन महिन्यात....

गेल्या दोन महिन्यांपासून इथे काहिच लिहिले नाही.
खरंतर लिहिण्यासारखं सांगण्यासारखं खूप काही केले आहे. कदाचित म्हणूनच लिहायला फुरसत काढता आली नाही.
सप्टेंबर मध्ये अमरावतीला आणि नाशिकला "योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" चे अभिवाचन केले.
खूप सुंदर प्रतिसाद होता.
त्यानंतर ऑक्टोबर मध्ये सेन्सॉरचे कायमस्वरूपी प्रमाणपत्र हाती आले आणि आंतरराष्ट्रिय लायसन्स देखिल प्रत्यक्षात हातात येऊन पडले! त्यामुळे उत्साहाने पहिल्यावहिल्या जाहीर प्रयोगाच्या तयारीला लागले.

त्याचसुमारास नाट्यलेखिकांचा आंतरराष्ट्रीय मेळावा मुंबईत होऊ घातला होता. त्यानिमित्ताने अनेक विषयांची स्त्रीप्रधान दृष्टीकोनातून मांडणी असलेली नाटके पहाण्याची मेजवानी मिळाली. आपल्या देशातील आणि परदेशातील अनेक नाट्यलेखिका आणि रंगकर्मींना भेटता आले.

सर्वात छान घटना म्हणजे १० नोव्हेंबरला संध्याकाळी पहिला जाहिर प्रयोग करण्यापूर्वी ’द व्हजायना मोनोलॉग्ज’ ची मूळलेखिका ईव्ह एन्सलर हिच्याशी प्रत्यक्ष भेट घडली. ती अगदी अविस्मरणीय च होती. मराठी अनुवादात काम करणाऱ्या आमच्या सगळ्या टीम साठी तो क्षण अतिशय प्रेरणा देणारा होता. ईव्हने आमच्या अनुभवांबद्दल आस्थेने चौकशी केली. आम्हाला आमच्या संहितेवर सही करून शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या भेटीत आमच्या नाटकाचा प्रयोग पाहण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. आम्ही सगळ्या जणी या भेटीने अतिशय आनंदलो होतो आणि त्या आनंदाच्या भरात आमचे एकत्र फोटो मात्र काढले गेले नाहीत. त्यानंतर आम्ही ईव्ह एन्सलर च्या एकाही बैठकीला हजर राहू शकलो नाही - पण अनेक जणांनी सांगितले की तिने सर्व ठिकाणी अतिशय कौतुकाने आणि अभिमानाने आपल्या नाटकाचा मराठी अनुवाद झाल्याबद्दल उल्लेख केला.

No comments:

Post a Comment