Friday, July 16, 2010

"Breaking Silence, Voicing Concerns"

मी आज एक नवीन ब्लॉग सुरू करीत आहे. ब्लॉगचे नाव आहे "Breaking Silence"
"योनीच्या मनीच्या गुजगोष्टी"या माझ्या नाटकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळेच
"Breaking Silence,Voicing Concerns" ह्या प्रकल्पाची कल्पना सुचली. नाटकाच्या प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांना आपले खासगी अनुभव, काळज्या आणि विचार माझ्याजवळ सांगावाश्या वाटत असत. प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चांना तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होताच; शिवाय अनेकजणी फोनवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून बोलत असत..... लैंगिकता या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयाबद्दल बोलायला लोकांना ‘जागा’ हवी असते - हेच यातून सिद्ध होत असे! अशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठीची जागा तयार करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून मी करीत आहे.
नुकताच या प्रकल्पाचा पहिला टप्पा मी पूर्ण केला आहे. त्यातील अनुभव आणि निरीक्षणे यांची देवाणघेवाण करण्यासाठी हा नवीन ब्लॉग मी सुरू केला आहे.
ह्या ब्लॉगवर आपले विचार, सूचना आणि अनुभव यांचे स्वागत आहे.
http://breakingsilence-vandana.blogspot.com/

Welcome to my new blog - "Breaking Silence" The blog is about my project "Breaking Silence, Voicing Concerns" This project is an experiment to evolve safe democratic spaces for dialogue about issues related sexuality. I have recently completed the first phase of the project. I will share my experiences in this project through this blog. This is a multilingual blog - Readers are most welcome to share their views and experiences in the language they are comfortable to express.

Wednesday, June 30, 2010

‘अविस्मरणीय’

‘अविस्मरणीय’ असं विशेषण वापरता येईल असे अगदी मोजके क्षण मी अनुभवले आहेत!गेल्या आठवड्यात धारावीतल्या महिलांसाठी केलेला प्रयोग आणि त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पा - हे मला कधीच विसरता येणार नाहीत.....आमच्या संपूर्ण टीमसाठीच तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
दोनशे बायकांनी भरलेलं पु.ल.देशपांडे अ‍ॅकॅडमीचं मिनी थिएटर - साधारणपणे २० ते ५० वर्ष वयोगटातल्या कष्टकरी बायका आणि मुली - त्यातल्या बहुतेक जणींनी कधी नाट्यगृहात जाऊन नाटक कधी पाहिलेलंच नव्हतं..... धारावीच्या आतल्या भागांमधून त्या खास बसने नाटकाला आल्या होत्या... प्रयोगाआधीच्या त्यांच्या गलबल्यामधून त्यांची उत्सुकता आम्हा कलाकरांपर्यंत पोचत होती.... आपलं नाटक यांना समजेल की नाही , रुचेल की नाही याची आम्हाला देखिल काळजी होतीच.....नाटकाच्या सुरुवातीला आम्ही निवेदन करताना प्रेक्षकांना ‘योनी’ हा शब्द म्हणायला लावतो. . . तिथपासूनच सगळ्यांनी नाटकातल्या खट्याळपणाची मजा घ्यायला सुरुवात केली. आणि मग वाक्यागणिक येणारे उत्स्फूर्त हशे आणि टाळ्या ...यांच्या संगतीने प्रयोग रंगतच गेला.... कितीतरी ठिकाणी त्यांच्या अनावर हसण्यामुळे आम्हाला संवाद थांबवून ठेवावे लागत होते... काही वेळा तर पुढचा प्रवेश सुरू करेपर्यंत सुरू राहिलेल्या हशा आणि टाळ्यांमुळे दोन प्रवेशांमधे असलेलं संगीतदेखिल ऐकू येत नव्हते -

इतका उसळता प्रतिसाद इतक्या जवळून आम्ही कधीच अनुभवलेला नव्हता....मार्च मध्ये रवींद्र नाट्य मंदीरात आस्था परिवार संस्थेशी जोडलेल्या मंडळींसमोर प्रयोग झाला तेव्हा प्रोसिनिअम थिएटरमुळे प्रेक्षक आमच्या पासून तसे लांबच होते. पण आमच्या नाटकाची खरी मजा मीनी थिएटरमध्येच येते. एकेका प्रेक्षकाच्या डॊळ्यात पाहून श्वास- उच्छवासांसहित आपलं म्हणणं पोचवता येतं... ‘या हृदयीचे त्या हृदयी ’ म्हणतात तसं...प्रेक्षकांचे सगळे प्रतिसाद ही कलाकारांना नवी ऊर्जा देत रहातात... एकतर इतका इंटिमेट विषय आणि इंटिमेट ऑडिटोरिअम -आणि इतके उत्सुक प्रेक्षक -
प्रयोगानंतर अनेक जणींनी आम्हाला येऊन मिठ्या मारल्या- "आमच्या मनाच्या आतलंच तुम्ही स्टेजवरून बोलत होता- ते लई भारी वाटलं" इथून प्रतिक्रियांना सुरुवात झाली.... कुणाला बॅंडिट क्वीन सिनेमाची आठवण झाली होती तर कुणाला स्वत:च्या मुलीच्या बाळंतपणाची- हे नाटक खासकरून पुरुषांना दाखवायला पायजे - असं कुणी म्हणत होतं तर मधेच -नाटकाबद्दल मला बोलायचं आहे पण डोअरकीपर काकांना बाहेर जायला सांगा अशी एखादी विनंती येत होती....
नाटकात "चूत" या अपमानकारक शिवीसारख्या शब्दाला आम्ही नवे रूप देतो, त्यावर सगळ्याजणी खूष होत्या,काही जणींना तो शब्द म्हणायची लाज वाटत होती पण सुनीता लाजत लाजत जे म्हणाली ते मात्र सगळ्य़ांनाच पटलं - ती म्हणाली की इतकी वर्ष मी आपल्या त्या जागेकडे "शी,घाण" या दृष्टीनेच पाहिले होते; पण आजमुझे अपनी चूत पर नाझ है!- मग आणखी एक ताई उठून म्हणाल्या ‘ आजवर हा शब्द मी फक्त ऐकला होता पण आता मी हक्कने बोलणार आहे - चूत! ’ ह्या म्हणण्यावर एक जोरदार आरोळी आली- चूत की जय हो! आणि सगळं हॉल ह्या घोषणेने दणाणून गेला... चूत की जय हो! नाटकाचं सार त्यांनी किती थोडक्या शब्दात मांडलं ...आमच्या टीमला ही घोषणा आणि ती देणाऱ्या सगळ्याजणी फारच आवडल्या आहेत.... आता प्रत्येक प्रयोगाच्या आधी आम्ही देखील म्हणणार आहोत - चूत की जय हो!

Monday, June 21, 2010


योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
रविवार २७जून संध्याकाळी ४.
४५ वाजता
रविंद्र नाट्यमंदीर,प्रभादेवी.


मुंबईतला यानंतरचा सर्वांसाठी खुला प्रयोग सप्टेंबर मध्ये

Wednesday, June 16, 2010

पुन्हा एकदा मुंबईच्या वस्त्यांमध्ये रहाणाऱ्या कष्ट्करी महिलांपर्यंत नाटक घेऊन जाण्याची संधी मिळाली आहे. धारावीतील महिलांसाठी ‘जेंडर आणि सेक्शुअ‍ॅलिटी’ या विषयावर एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून "योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" हे नाटक पहाणे आणि त्यावर चर्चा करणे असा कार्यक्रम पु.ल.देशपांडे कला अकादमी च्या मिनी थिएटर मध्ये २९ जून रोजी होणार आहे. हे नाटक त्यांना कोणत्या प्रकारे आणि किती आपलेसे वाटते - हे समजून घ्यायची मला फारच उत्सुकता वाटते आहे.

Monday, June 14, 2010

नाशिकचा प्रयोग अगदी निर्विघ्नपणे पार पडला. नाटकाचा प्रकाशयोजनाकार - विनोद राठोड याने उत्कृष्ट जनसंपर्क केला होता. शिवाय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती आल्या होत्या. रवीवारी दुपारची वेळ असूनही प्रेक्षक अगदी हौसेने नाटकाला आले होते. नाटकानंतर अनेकजणांनी आवर्जून येऊन प्रतिक्रिया पोचवल्या. सर्वांना नाटक आवडलं ह्यामुळे समाधान वाटतंआहे. ‘पुन्हा लवकर प्रयोग करा, आत्ताच्या प्रयोगाची आम्ही माउथ पब्लिसिटी करून ठेवतो ’- असेही प्रेक्षकांनी अगत्याने सांगितले! या सर्वांमुळे आमचा सर्वांचा उत्साह वाढला आहे.
या शिवाय, मी पूर्वी नाशिकला रहात असताना तयार झालेल्या अनेक मैत्रसंबंधांना नव्याने उजाळा मिळाला- हा सर्वात मोठ्ठा बोनस म्हणावा लागेल!

Friday, June 11, 2010

रविवारी १३ जून ला नाशिक मध्ये नाटकाचा प्रयोग आहे. मागच्या वर्षी एकदा अभिवाचनाच्या रूपात निमंत्रितांसाठी या नाटकाचा प्रयोग नाशिक मध्ये केला होता. त्यानंतर हा तिकिट असलेला प्रयोग नाशिकमध्ये प्रथमच होतो आहे. मागच्या वेळी झालेल्या प्रयोगाला खूपच छान प्रतिसाद मिळाला होता - अनेक पत्रकार, लेखकाअणि सामाजिक चळवळीत असलेले लोक प्रेक्षकांत होते. नाटकानंतर श्री.विनायकदादा पाटील यांनी स्त्रीयांच्या लैंगिकतेच्या संदर्भात चक्रधर स्वामींच्या काही ओळी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की- पूर्वीच्या काळी कीर्तनकारांनी जसे जनजागृतीचे काम केले तसेच तुम्ही या नाटकाद्वारे करीत आहात. नाशिकमधल्या प्रेक्षकांनी हे नाटक हसत्याखेळत्या नाटकाच्या रूपात रंगमंचावर आणण्यासाठी खूप प्रोत्साहनदेखिल दिले होते. पण आता या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतोय त्याची थोडिशी काळजी वाटते आहे!
कारण प्रयोगाच्या जाहिरातीला थोडा प्रॉब्लेम आलाय खरा! गावकरी आणि देशदूत या दोन वृत्तपत्रांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या. पण, सकाळने मात्र नाटकाच्या नावात "योनी" हा ब्द असल्याने जाहिरात छापायला नकार दिला होता. मग नाशिकच्या आमच्या मित्राने पुणे सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आमची जुनी जाहिरात दाखवली आणि हा शब्द जाहिरातीत वापरला जाणे त्यांच्या वर्तमानपत्राच्या धोरणाच्या विरुद्ध नाही हे दाखवून दिले- आता उद्या जाहिरात छापली जाईल अशी आशा आहे.
अशा प्रसंगामुळे हे नाटक केले जाण्याची किती गरज आहे- त्याची पुन्हा एकदा जाणीव होत रहाते!
या नाटकाच्या निमित्ताने अनेक विरोधाभासांना सामोरे जावे लागले आहे. कधी त्याची गंमत वाटते तर कधी मनस्तापदेखिल होतो.
नुकतेच मी ‘बाईंडरचे दिवस’ पुस्तकाचा संदर्भ असलेले हिंदी नाटक पाहिले - ‘सेक्स,मोरॅलिटी अ‍ॅन्ड सेन्सॉरशिप’! त्या काळी कमलाकर सारंग यांना आलेल्या अनेक प्रतिकूल अनुभवांचा त्यात उल्लेख आहे. त्यातले ते प्रसंग पाहात असताना मला माझ्या नाटकासंदर्भात आलेले अनुभव आठवत होते. सुदैवाने माझ्या नाटकाला कुठल्याही मूलतत्त्ववादी राजकीय पक्षांनी विरोध केला नाही. मुंबईत तर प्रेक्षकांनी सुरुवातीपासून सकारात्मक प्रतिसाददिलेला आहे. नाशिकचे प्रेक्षक ह्या नाटकाचा स्वीकार करतात की नाही त्याची मला उत्सुकता आहे आणि काळजी देखील!





योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
रविवार दिनांक १३ जून दुपारी १.० वाजता
कालिदास नाट्यमंदीर, नाशिक

Wednesday, May 26, 2010

योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
२७ मे २०१०
रात्री ८ वाजता
यशवंत नाट्यमंदीर, माटुंगा.

Monday, May 3, 2010

गेल्या दोन महिन्यात....




जवळजवळ दोन महिन्यांनी पोस्ट लिहि्ते आहे. एकतर इंटरनेटचे कनेक्शन नव्हते आणि मुख्य म्हणजे प्रयोगांमुळे वेळ झाला नाही. नव्या टीममध्ये सर्वांचे सूर छान जुळलेले आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद फारच उत्तम आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात नाटकाचे भरपूर प्रयोग झाले.
हे
नाटक समाजाच्या विविध स्तरातल्या लोकांपर्यंत पोचावे अशी माझी ईच्छा होती, ती खऱ्या अर्थाने सफल होते आहे. गेल्या दोन महिन्यात पु.ल.देशपांडे-मिनी थिएटर या नेहमीच्या जागेसोबतच TISS चे कन्वेन्शन सेंटर, रविंद्र नाट्य मंदीर, यशवंत नाट्यगृह (माटुंगा) आणि दिनानाथ नाट्यगृह(विलेपार्ले) अशा विविध ठिकाणी प्रयोग करता आले. आणि सर्व ठिकाणी तितक्याच विविध प्रकारच्या प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला ह्याचा मनापासून आनंद होतो आहे!
समन्वय संस्थेने आणि TISS च्या special cell for women यांनी आयोजित केलेल्या प्रयोगांमुळे अनेक मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहोचता आले. उर्मिला पवार,डॉ.विठ्ठल प्रभू,डॉ. राजन भोसले, हरीश सदानी यांच्या सारख्यास्त्री-पुरुष समानताआणि लैंगिकता या विषयाशी संबंधित काम करणाऱ्या जाणत्या व्यक्तींकडून पसंतीची पावती मिळणे, कौतुक होणे ह्याचं आम्हाला सर्वांनाच खूप महत्त्व वाटतं! त्याचसोबत अनंतजोग, आरती अंकलीकर, उदय टिकेकर, अनिलगवस, प्रमोद पवार अशा नाट्यक्षेत्रातल्या मंडळींच्या पसंतीमुळेही आमच उत्साह ाअणि आत्मविश्वास प्रयोगागणिक वाढत चालला आहे.
TISS च्या सुंदर ऑडिटोरिअम मध्ये तर देशभरातील निरनिराळ्या राज्यांमधून या विषयांवर काम करणारे कार्यकर्ते आलेले होते. त्याचसोबत मुंबईतील अनेक कार्यकर्ते केवळ नाटक पहाण्यासाठी TISS मध्ये संध्याकाळी खास वेळात वेळ काढून आले होते. सर्वांनी नाटकाचं भरभरून कौतुक तर केलंच ; शिवाय विविध वस्त्यांमध्ये नाटकाचे प्रयोग करण्याविषयी उत्सुकता दाखवली.
मुंबईतल्या
वस्त्यांमध्ये रहाणाऱ्या कष्टकरी वर्गातील महिलांसाठी या नाटकाचे प्रयोग सादर करता यावेत, यासाठी मी बराच काळ पासून प्रयत्न करीत होते.२६एप्रिल ला या प्रयत्नांना यश आलं आणि आस्था परिवार या संस्थेशी जोडलेल्या मुंबईतल्या सभासदांसाठी रवींद्र नाट्य मंदीर मध्येप्रयोग करता आला. ज्यांना नाट्यगृहातलं नाटक पहायची संधी क्वचितच मिळते अशा लोकांसाठी रवींद्र नाट्य मंदिरात प्रयोग आयोजित करता आला याचं मला विशेष समाधान वाटतं! एका वेळी संख्येने जवळजवळ एकहजाराच्या आसपास प्रेक्षकवर्ग लाभण्याचे भाग्य कितीशा प्रायोगिक नाटकांच्या वाट्याला येत असेल?
या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मध्यमवर्गीय आणि वंचितवर्गातील प्रेक्षकांनी एकत्र बसून या प्रयोगाचा आनंद घेतला. आस्था परिवार मधील महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर अशा विविध प्रकारच्या व्यक्ती अगदी मालवणी,भिवंडी, पनवेल, मीरारोड अशा मुंबईआणि आसपासच्या परिसरातून आलेल्या होत्या. विविध पार्ष्वभूमीच्या प्रेक्षकांनी नाटकाला दणकेबाज प्रतिसाद दिला. कष्टकरीवर्गातील प्रेक्षकांच्याही पसंतीला नाटक उतरलं यामुळे मला फार बरं वाटलं! आस्था परिवारशी जोडलेल्या प्रेक्षकांच्या फीडबॅकबद्दल एक खास पोस्ट लवकरच लिहून काढेन. आता आणखी विविध संस्थांना वस्तीवस्तीमधील स्त्रीयांना हे नाटक दाखवायची ईच्छा आहे, आणि आम्हालाही हे प्रयोग करायची उत्सुकता आहे.

Wednesday, March 10, 2010

8march2010

या वर्षीचा ८मार्च मी नाटकाचा प्रयोग करून साजरा केला.
खरंतर हे काम मला २००९ मध्ये करायचं होतं, पण अनेक अडचणींमुळे ते शक्य झालं नव्हतं! गेल्या वर्षी ४ एप्रिल ला मी माझ्या नाटकाचे प्रयोग सुरू केले होते तेव्हापासूनच्या अनेक आठवणींना मनात उजाळा मिळाला. गेल्या वर्षभरात माझा जनसंपर्क खूपच मोठ्या प्रमाणात वाढला... अनेक इंटरेस्टिंग माणसांच्या ओळखी झाल्या. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी मिळाली...अर्थातच त्याचे काही चांगले आणि काही वाईट परिणामदेखिल झाले.
चांगल्या परिणामांबद्दल बोलायचं तर - इंग्रजी वृत्तपत्रांमधल्या लेखांमुळे अनेक मराठी माणसांनी नाटकाला "सिरीअसली" घेतलं! लोकसत्ता मधल्या शुभदा चौकर यांच्या लेखामुळे अनेक महिलांचे या नाटकाबद्दल कुतूहल जागे झाले. अगदी परवाच्या प्रयोगात देखिल अनेकजणींनी त्या लेखाची आठवण काढली. लोकप्रभातील शिरीषकणेकरांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया आवडल्याची पत्रे मला अजूनही येत असतात. या लेखामुळे देशोदेशीच्या मराठी माणसांशी संपर्क आला. त्यांना मराठी मुलूखातल्या घडामोडींची किती उत्सुकता वाटते त्याची झलक मिळाली . . . या सगळ्यात जास्त आनंद झाला तो नाटक करण्यापूर्वीचा माझा अंदाज खरा ठरल्याबद्दल! नाटाकाच्या पहिल्या प्रयोगापूर्वी अनेकांना माझी काळजी वाटत होती, काहींना भिती वाटत होती - पण मला मनापासून विश्वास वाटत होता की या नाटकाचा आशय समजून घेण्याची किमान मुंबईतल्या मराठी प्रेक्षकांच्या मनाची नक्कीच तयारी आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवला आहे.
सुरुवतीला मी तिकिटे नसलेले प्रयोग केले. ठाण्याला एका डॉक्टरांच्या घरी, एका म्युनिसिपल ऑफिसच्या बोर्डरूम मध्ये, कम्युनिटी हॉल्स मध्ये हे प्रयोग होत असत. . . लोक प्रयोग संपल्यावर आपापल्या मर्जीनुसार टोपीमध्ये पैसे टाकत असत. अनेकदा जाण्यायेण्याचा खर्च देखिल त्यातून निघत नसे. तरीही संस्था आणि संघटना यांच्याशी जोडलेल्या व्यक्तींसमोर एकप्रकारे सुरक्षित वातावरणात हे प्रयोग होत होते.
पण कायमस्वरूपी सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाल्यावर नोव्हेंबर मध्ये मी तिकिट लावून प्रयोग सुरू केले. तेव्हा माझ्या मनात किंचित भीती होती, पण या प्रयोगांनाही जो घवघवीत प्रतिसाद मिळाला त्यामुळे तर उरलीसुरली भिती देखिल निघून गेली. हिंदी- इंग्रजी प्रयोगांपेक्षा अगदी निराळीच ट्रीटमेंट नाटकाला मी दिली आहे; तीदेखिल लोकांना आवडली याचं समाधान वाटतं!
पण या सगळ्या आनंदाला आणि समाधानाला एक द्वेषाची किनार आहेच! या नाटकामध्ये माझी भरपूर भावनिक आणि आर्थिक शक्ती गुंतली गेलेली आहे. हे नाटक करण्यासाठी मी भरपूर जोखीम घेतली आहे याची अनेकांना जाणीवच नसते. कदाचित म्हणूनच नाटकामुळे मला मिळालेल्या प्रसिद्धी बद्दल आणि किंचितशा पैशांबद्दल अनेकांना राग आहे. दुर्दैवाने स्वत:ला "नाट्यक्षेत्रातील" म्हणवणारी अनेक मंडळीदेखिल यात असतात! ही माणसे काही ना काही कुरापती काढून कटकटी करीत रहातात.
पण या माणसांमुळे मी काही मूलभूत महत्त्वाचे धडे शिकले आहे. त्याबद्दल पुढच्यावेळी....!

Monday, February 8, 2010

Sad news

आज एक अतिशय दु:खद बातमी इथे लिहावी लागते आहे.
"योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" नाटकातली कलाकार कविता जोशी हिचा अकाली मृत्यू झाला आहे.
कविता हसतमुख आणि उत्साही मुलगी होती. तिच्या अचानक निघून जाण्याने सर्वांनाच खूप धक्का बसला आहे.
तिच्या कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ मिळू दे!

Monday, January 18, 2010

Happy New Year

नव्या वर्षात पहिल्यांदाच आज ब्लॉग उघडला आहे! आणि मला नव्या वर्षाची किती छान भेट मिळाली आहे! अहाहा!!
चक्क २३ मेंबर्स! इतके लोक हा ब्लॉग वाचायला येतात, मेंबर देखिल होतात , हे पाहून खरंच खूप छान वाटतं आहे!
सध्या माझ्याकडे घरी कॉंप्युटर नाही आहे, त्यामुळे ब्लॉग लिहायला वेळ झालेला नाही.
शिवाय The Vagina Monologues या नाटकापासून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या माझ्या Breaking Silence, Voicing Concerns प्रोजेक्टचे कामदेखिल जोरात सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसात दोन वर्कशॉप्स पार पडली. लवकरच त्यावर आधारित लेख लिहून पूर्ण होईल. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी इतक्या संवेदनाशील विषयावर बोलणे आणि त्यातून काही सृजनशील निर्मिती केली जाणे हा अनुभव एकाच वेळी खूप आनंद देणारा आणि थकवून टाकणाराही आहे!
त्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. एकदा कॉम्प्युटर हाती आला की मग या ब्लॉगवर बरंच लिखाण येईल. तोपर्यंत सर्वांना Happy New Year!