This is a blog about my play "Yoneechyaa Maneechyaa Gujgoshti" . It is a first ever marathi translation of the internationally acclaimed play - "The Vagina Monologues"
Monday, February 18, 2013
१०० व्या रयोगानिमित्त महराष्ट्र टाईम्समध्ये लिहिलेला लेख
मौनाला
वाचा फोडण्यासाठी.....!
१४ फेब्रुवारीला माझ्या नाटकाचा १०० वा प्रयोग आहे ! १४ फेब्रुवारी या
तारखेशी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेशी माझ्या
नाटकाचं एक खास नातं आहे – सगळ्यांचा व्हॅलेंटाईन डे माझ्यासाठी असतो- “व्ही डे” - व्ही फॉर व्हॅलेंटाईन नव्हे
तर व्ही फॉर व्हजायना ! “द व्हजायना मोनोलॉग्ज” या नाटकामुळे व्हॅलेंटाईन डे या नव्या अर्थाशी जोडला गेलेला
आहे. या नाटकाच्या लेखिकेने - ईव्ह एन्सलरने – पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेत “व्हजायना मोनोलॉग्ज” या नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात केली. जगभरात स्त्रीयांवर केल्या
जाणाऱ्या अत्याचारांचा अंत व्हावा या उद्देशाने ती हे नाटक करायला लागली. नाटकाच्या उत्पन्नातून तिने
एक संस्था उभी केली. त्या संस्थेचेही
नाव आहे – V-Day ! गेली पंधरा वर्षे ही संस्था स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काम
करणाऱ्या संस्थांना मदत करते आहे. जगात १०० कोटी महिलांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे
अत्याचार होत असतो – तरीही हया
मुद्द्याला जगात कुठेच पुरेसे महत्त्व मिळत नाही म्हणून - महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध
जगातल्या सगळ्यांनी या वर्षीच्या १४फेब्रुवारीला आवाज उठवावा यासाठी आवाहन ईव्ह एन्सलरने
केले आहे. तिने या
कार्यक्रमाला नाव दिले आहे – वन बिलियन रायझिंग ! जगातल्या अनेक देशांनी तिच्या
या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे- अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आपल्याकडेही अनेक शहरांमध्ये
वन बिलियन रायझिंग चे कार्यक्रम होणार आहेत. पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमात
“व्हजायना मोनोलॉग्ज”च्या मराठी रुपांतराचा – “योनीच्या मनीच्या गुजगोष्टी” चा शंभरावा प्रयोग होणार
आहे!
चार वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्र टाईम्सच्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने
निघणाऱ्या मुंबई टाईम्सच्या पुरवणीच्या पहिल्याच पानावर – “व्हजायना मोनोलॉग्ज” मराठीत येत आहे – अशी बातमी प्रसिद्ध झाली
– तेव्हापासूनच
१४ फेब्रुवारी हा दिवस माझ्या नाटकाशी जोडला गेलाय! भल्यामोठ्या अक्षरात “व्ही फॉर
व्हजायना” लिहिलेले ते पान अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे! एखाद्या मराठी
वर्तमानपत्रात अशा पद्धतीने स्त्रीयांच्या लैंगिकतेशी जोडलेला एक `निषिद्ध’ शब्द झळकण्याची ती पहिलीच वेळ
असावी! त्यावेळी तर नाटकाचं नावदेखिल पक्कं ठरलं नव्हतं – “योनीसंवाद” असं किंचित गंभीर नाव त्या बातमीत आलं
होतं! कदाचित नाटकाचं असं नाव वाचून काही रंगकर्मी किंचित बिचकलेदेखील असावेत...! कारण
अनेकांनी नाटकाच्या नावातून हा शब्द गाळून टाकायची मला सूचना केली होती; अशा शब्दामुळे
प्रेक्षक नाटकाला येणारच नाहीत अशी भिती देखिल घातली होती. पण एकतर V- Day संस्थेच्या
अनुवादाच्या नियमांनुसार नाटकाच्या नावात हा शब्द असणं गरजेचं होतं आणि मुख्य म्हणजे
माझा मराठी नाट्यरसिकांच्या विवेकबुद्धीवर भरवसा होता. नाटकाच्या नावातल्या एका
शब्दाला घाबरून लोक नाटकापासून दूर पळतील - असं मला अजिबात वाटत नव्हतं! त्यामुळे
मी नाटकाच्या नावातून हा शब्द मुळीच वगळला नाही. नाटकाच्या तालमीच्या दरम्यान मला “योनीच्या मनीच्या गुजगोष्टी ” हे थोडं
हलकंफुलकं नाव सुचलं! जसजशी पहिल्या
प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली तसतसा इंग्लिश आणि मराठी वृत्तपत्रांमधून
त्याविषयीच्या बातम्या आणि मुलाखतींचा ओघ सुरू झाला आणि त्यात हेच लांबलचक नाव
छापून येऊ लागलं! एकप्रकारे
हळूहळू हे नाव सगळ्यांच्या अंगवळणी पडायला लागलं – त्यामुळे नंतर कोणी या शब्दाला आक्षेप घेतला नाही. उलट अगदी पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांचा नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळत
गेला. इतकंच नाही तर गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातल्या लहान
मोठ्या शहरांमधल्या साधारण पंचवीसेक हजार प्रेक्षकांनी तरी माझ्यासोबत “योनी” हा शब्द स्पष्टपणे उच्चारलाही आहे. प्रेक्षकांना “योनी”हा शब्द म्हणायला लावूनच मी नाटकाची
सुरुवात करते.
नाटक सुरू करताना मी
जेव्हा प्रेक्षकांना विचारते की आपल्यापैकी कितीजणांनी हा शब्द चारचौघात स्पष्टपणे
म्हटला आहे? तेव्हा साधारण दोनशे
प्रेक्षकांपैकी जेमतेम तीन-चार हात वर केले जातात – बाकीचे लोक जागच्याजागी अवघडून जातात किंवा कसनुसं हसतात! अनेक प्रेक्षक नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी येऊन बहुधा आयुष्यात प्रथमच
हा शब्द उच्चारत असतात – कारण स्त्रीयांची लैंगिकता हा विषयच
मुळी आपण आपल्या भाषेतून हद्दपार केलेला असतो. खरंतर लैंगिकता
हा विषय अन्न, पाणी, पर्यावरण आणि रोजगाराइतकाच
महत्त्वाचा आहे. लैंगिकतेशी जोडलेल्या कारणांवरून व्यक्ती-व्यक्तींमधले आणि निरनिराळ्या सामाजिक गटांमधले सत्तासंबंध घडत-बिघडत असतात – त्यामुळे तो राजकीय अर्थानेही महत्त्वाचा
विषय आहे. पण एकीकडे धंदेवाईक प्रसारमाध्यमे जास्तीतजास्त आक्रमकपणाने
कामुक प्रतिमांची उधळण करताहेत तर दुसरीकडे वैद्यकीय परिभाषा मात्र धोका आणि सावधगिरीच्या
संदर्भातच लैंगिकतेकडे पाहते आहे. भिती, लाज, हावरटपणा, हिसकाहिसकी,
घृणा, नकोसेपणा यांच्या सावटाखाली स्वत:च्या देहाशी जोडलेल्या सगळ्या सुंदर भावना दडपून टाकल्या जातात. लैंगिकतेला मौनाच्या तटबंदीमध्ये बंदिस्त करून टाकलं जातं! ह्या तटबंदीला भगदाड पाडण्याचं काम हे नाटक करते आहे.
नाटकभर
‘योनी’ या शब्दाच्या वेगवेगळ्या छटा निरनिराळ्या स्त्रीयांच्या
अनुभवांच्या संदर्भात समोर येत रहातात. अगदी शिवी म्हणून वापरले
जाणारे ‘घाणेरडे’ शब्द देखिल ठामपणाने मंचावरून
बोलले जातात. लैंगिकतेच्या संदर्भातल्या भाषेतून समाजातल्या सत्तासंबंधाचे
प्रतिबिंब आपल्या व्यवहारात कसे दिसते आणि या सत्तासंबंधांना हादरा देण्यासाठी काय
करावे लागेल याची मोकळेपणाने चर्चा होते. अगदी हसतखेळत लैंगिकतेविषयीच्या
अनेक गृहितकांना मोडीत काढले जाते. या विनोदांमध्ये कुणाचा अपमान
नाही की लैंगिकक्रियांचे विकृत उल्लेख नाहीत – पण समाजाने निमूटपणाने
मान्य केलेल्या विरोधाभासांवर टीका मात्र आहे. विनोदाची ही निराळी
जातकुळी प्रेक्षकांना हसवताहसवताच अंतर्मुखदेखिल करते. म्हणूनच
कदाचित मासिकपाळी, बलात्कार, उत्कटप्रणय,
हस्तमैथुन, बाळाचा जन्म अशा विविध अनुभवांचे तपशीलवार
वर्णन असूनदेखिल प्रेक्षक कधी चाळवले जात नाहीत. आज ९९ प्रयोगानंतर
मी अभिमानाने सांगू शकते की एकाही प्रयोगाच्या दरम्यान प्रेक्षकांमधून निषेधाचा सूर
उमटलेला नाही. स्त्रीयांना तर हे नाटक आपलेसे वाटतेच पण अनेक
पुरुष प्रेक्षकही आवर्जून भेटून सांगतात की – अतिशय धीट असूनही
अजिबात अश्लील नसलेले हे नाटक पाहून स्वत:च्या लैंगिकतेकडेही
त्यांना गंभीरपणाने बघावेसे वाटायला लागले आहे. जेव्हा नाटकाचे
तिकिटाशिवाय प्रयोग केले जातात तेव्हा मी नाटकानंतर चर्चा व्हावी असा आग्रह धरते –
या चर्चेच्या निमित्ताने निखळ आनंद, आत्मसन्मान,
समलैंगिकता, लैंगिकतेबद्दलचे अधिकार असे अनेक सकारात्मक
पैलू सार्वजनिक ठिकाणी बोलले जातात. निषिद्धतेच्या कुंपणातून
लैंगिकता हा विषय बाहेर पडतो आणि पुन्हा नव्याने मला नाटकाचे महत्त्व उमजते.
नव्याने आणखी प्रयोग करायची उमेद जागी रहाते! Monday, February 13, 2012
पुन्हा एकदा
अनेक महिन्यात ब्लॉग लिहिला नाही. . . काम मात्र भरपूर सुरू होते ; इतके की - जून नंतर नाटकाचे प्रयोग करायलाही वेळ मिळेनासा झाला. मागच्या महिन्यापासून मात्र टीममधील सगळ्यांनीच नाटकासाठी वेळ काढायचं मनावर घेतलंआणि पुन्हा प्रयोग सुरू झाले आहेत.
१४ फेब्रुवारीच्या निमित्ताने सचिन परब यांनी नवशक्तिसाठी नाटकासंबंधीच्या अनुभवांबद्दल लेखदेखिल लिहून घेतला आणि पुन्हा ब्लॉग लिहायला सुरुवात कराविशी मनापासून वाटायला लागले.
आता दर आठवड्यात मी लिहिलेला एक नवीन लेख नक्की पोस्ट करणार आहे. काही पोस्ट नाटकाच्या प्रयोगांबद्दल असतील, तर काही पोस्ट लवकरच येऊ घातलेल्या नवीन नाटकासंबंधी असतील. काही पोस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांध्ये जेंडर व सेक्शुअॅलिटीविषयी मला आवडलेल्या/न आवडलेल्या चित्रणाबद्दल देखिल मला लिहायचे आहे.
आज VDay च्या मुहूर्तावर नवशक्ति मध्ये रविवाी प्रसिदध झालेल्या लेखाला ब्लॉगवर प्रसिद्ध करून सुरुवात करते आहे. या लेखाची लिंक मला इंटरनेटवर नवशक्ति साईटवर सापडली नाही- त्यामुळे त्या लेखाचा फोटोही इथे लावला आहे.
गुजगोष्टींच्या गुजगोष्टी!
आला .. . व्हॅलेंटाईन डे आला! १४ फेब्रुवारी. . . तारिख जवळ येऊ लागली की वातावरण गुलाबी आणि लाल रंगाने भरून जाते. . प्रेमाचे वारे वाहूलागतात . . .गुलाबांचा सुगंध ओसंडून जाऊ लागतो. . . गिफ्टस च्या नवनव्या आयडियांनी जाहिराती मनाला भुलवायला लागतात, अनेक “प्रेमळ” जिवांच्या मनात येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेची स्वप्ने रुंजी घालू लागतात. . . आणि अनेकजण पूर्वी साजऱ्या केलेल्या किंवा साजऱ्या करायच्या राहून गेलेल्या प्रेमदिवसाच्या आठवणींनी हुरहुरायला लागतात – माझ्या मनात मात्र व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी माझ्या नाटकाशी जोडलेल्या विविध आठवणींचा पट उलगडला जातो! कारण सगळ्यांचा “व्हॅलेंटाईन डे” माझ्यासाठी असतो –“व्ही डे”!
व्ही फॉर व्हॅलेंटाईन नाही - व्ही फॉर व्हजायना!
व्हजायना म्हणजे योनी – बाईच्या शरीरातला असा एक अवयव ज्याचं सामान्यपणे सभ्य भाषेत नाव घ्यायला आपण कचरतो! एक तर डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलताना अत्यंत गंभीरपणे आपण इंग्लिशमध्ये चटकन हा शब्द बोलून टाकतो - किंवा मग त्या अवयवाबद्दल बोलताना भरपूर पाचकळ विनोद केले जातात. . . नाहितर एकमेकांचा अपमान करण्यासाठी शिवी म्हणून हे शब्द वापरले जातात, संडासात चित्र काढली जातात! पण मी मात्र गेल्या तीन वर्षांपासून अभिमानाने “योनी” हा शब्द म्हणायला लागले आहे. इतकंच नाही तर माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या जवळजवळ वीसेक हजार माणसांनी तरी हा शब्द मोठ्याने उच्चारलेला आहे. ही किमया घडवून आणली माझ्या नाटकाने - कारण माझ्या नाटकाचं नावच आहे –“योनीच्या मनीच्या गुजगोष्टी”! अर्थातच - “व्हजायना मोनोलॉग्ज” या जगभरात गाजलेल्या इंग्लिश नाटकाचा मराठी अनुवाद.
याच नाटकामुळे व्हॅलेंटाईन डे हा दिवस “व्ही फॉर व्हजायना” या नव्या अर्थाशी जोडला गेला. या नाटकाच्या लेखिकेने - ईव्ह एन्सलरने - चौदा वर्शांपूर्वी अमेरिकेत “व्हजायना मोनोलॉग्ज” या नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात केली. जगभरात स्त्रीयांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांचा अंत व्हावा यासाठी ती हे नाटक करायला लागली. या नाटकाच्या उत्पन्नातून तिने एक संस्था उभी केली. त्या संस्थेचेही नाव आहे – व्ही-डे! या संस्थेतर्फे स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कामकरणाऱ्या संस्थांना मदत केली जाते.
दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यांमध्ये जगात जास्तीतजास्त ठिकाणी हे नाटक व्हावे यासाठी ही संस्था प्रोत्साहन देते. आजवर जगातल्या १४० देशांमध्ये हे नाटक विविध भाषांमधून केले गेलेले आहे. या नाटकाच्या प्रयोगातून येणारे उत्पन्न लोकांनी आपापल्या शहरातील स्त्रीविषयक काम करणाऱ्या संस्थेला द्यावे अशी कल्पना असते. मला ही कल्पना खूपच आवडली आणि आपणही या नाटकचा मराठीत प्रयोग करायचा असे माझ्या डोक्यात शिरले. त्या दिवसात मी या कल्पनेने अगदी भारून गेले होते. अनेक माणसांशी मी या नाटकाबद्दल भरभरून बोलत असे. मी या नाटकाचे इंग्लिश आणि हिंदीत होणारे प्रयोग पाहिले - “नवा माणूस’ या दिवाळी अंकात त्याबद्दल एक लेखसुद्धा लिहिला होता. व्ही-डे संस्थेकडून रीतसर परवानगी मिळवून मी मराठीत या नाटकाचा अनुवाद देखिल करून ठेवला- नेमकी त्याचवेळी ही सगळी माहिती सचिन परब यांनी इंटरनेटवर वाचली आणि माझ्याशी संपर्क केला. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने निघणाऱ्या मुंबई टाईम्सच्या पुरवणीच्या पहिल्या पानावरच एका चौकटीत माझे हे नाटक येत असल्याची बातमी त्यांनी केली होती. तेव्हापासून १४ फेब्रुवारी हा दिवस माझ्या नाटकाशी जोडला गेला!
भल्यामोठ्या अक्षरात “व्ही फॉर व्हजायना”लिहिलेले ते पान अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे! एखाद्या मराठी पेपरमधे अशा पद्धतीने एक निषिद्ध शब्द झळकण्याची पहिलीच वेळ असावी! त्यावेळी तर नाटकाचं नावदेखिल पक्कं ठरलं नव्हतं – योनीसंवाद असं किंचित गंभीर नाव त्या बातमीत छापलेलं होतं! नाटकाचं हे नाव वाचूनच लोक किंचित बिचकून गेले असावेत! अनेकांनी नाटकाच्या नावातून हा शब्द गाळून टाकायची मला सूचना केली होती; ह्या नावामुळे प्रेक्षक येणारच नाहीत अशी भिती देखिल घातली होती. पण एकतर “व्ही-डे”संस्थेच्या नियमानुसार नावात हा शब्द असणं गरजेचं होतं आणि मुख्य म्हणजे माझा मराठी नाटकाच्या प्रेक्षकांच्या बुद्धीवर भरवसा होता. नाटकाच्या नावात “योनी” हा शब्द आहे;म्हणून लोक नाटकापासून दूर पळतील- असं मला अजिबात वाटत नव्हतं! नाटकाच्या तालमीच्या दरम्यान मला योनीसंवाद ऐवजी “योनीच्या मनीच्या गुजगोष्टी ” हे नाव सुचलं! जसजशी नाटकाची प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली तसतसा इंग्लिश आणि मराठी वृत्तपत्रांमधून त्याविषयीच्या बातम्या आणि मुलाखतींचा ओघच सुरू झाला! त्यानंतर माझ्यावर प्रेक्षकांच्या फोन आणि ईमेल्सचा पाऊस पडायला लागला. प्रेक्षकांवरचा माझा विश्वास खरा ठरला - अगदी पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांचा नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळत गेला.
गेल्या तीन वर्षांत या नाटकाचे मी ८५ प्रयोग केले आहेत. वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसमोर केलेल्या या प्रयोगांच्या आठवणींनी दरवर्षी १४ फेब्रुवारीला मन गजबजून जातं . . . सुरुवातीच्या दिवसांपासूनच्या अनेक घडामोडी अगदी लख्खपणाने आठवतात – पहिल्या प्रयोगाच्या वेळची किंचित धाकधुक आठवते- धीर देणारे आणि त्याचबरोबर काळजी करणारे मित्रमैत्रिणी आठवतात - नंतर प्रेक्षकांनी भरभरून केलेलं कौतुक आठवतं –
किती विविध प्रकारचे प्रेक्षक माझ्या नाटकाला लाभले – त्यात अगदी साध्यासुध्या मध्यमवर्गीय गृहिणी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, धारावी सारख्यावस्तीत रहाणाऱ्या महिला, लैंगिकमजुरी(सेक्स वर्क) करणाऱे स्त्री-पुरुष आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती होत्या, तशाच शांता गोखलें आणि पुष्पा भावे यांच्यासारख्या जेष्ठ समिक्षिका होत्या, मीना कर्णिक - शुभदा चौकर, श्रीकांत बोजेवार-राजीव खांडेकर- अवधूत परळकर-सुनील कर्णिक-जयंत पवार असे पत्रकार होते ; विनायकदादा पाटील यांच्यासारखे नेतेमंडळी होती, तसेच- मकरंद अनासपुरे, प्रदीप भिडे, रीमाताई, प्रमोद पवार, आतिशा नाईक,आसावरी घोटीकर,अतुल पेठे, नंदू माधव असे कितीतरी कलाकारही होते! यासर्वांनीच वेळोवेळी मोकळेपणाने कौतुक केलं, सूचना केल्या आणि पाठिंबादेखिल दिला.
सुरुवातीचे पंचवीस प्रयोग तर मी महिलांवरच्या हिंसाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थांसाठी तिकिटाशिवायच केले होते. मुलुंडला महापालिकेच्या एका ऑफिसच्या बोर्डरूममध्ये आणि एकदा तर चक्क एका डॉक्टरांच्या घरी हळदीकुंकवालाच या नाटकाचा प्रयोग केला होता. त्यावेळी आम्ही पाच जणी खुर्च्यांवर बसून नाटकाचे अभिवाचन करत असू! त्यामुळे कुठेही सहज प्रयोग करता यायचा. या विषयाची आस्था असणाऱ्या लोकांपर्यंत हे नाटक पोचावं आणि स्त्रीयांच्या लैंगिकतेसंदर्भात चर्चा व्हावी – अशीच कल्पना होती. पण कधीकधी “नाटक” बघायच्या कल्पनेने आलेले लोक त्यामुळे किंचित हिरमुसले होत असत. तरी मुंबईतल्या आणि कोल्हापूर, रत्नागिरी, नासिक, अमरावती सारख्या शहरातून संस्था प्रयोगासाठी बोलवत असायच्या. या संस्थांशी जोडलेले कार्यकर्ते आणि सहकारी नाटकाच्या विषयाबद्दल उत्साहाने बोलायचे- कधीकधी नाटकातल्या शब्दांविषयी प्रश्न विचारायचे- चर्चा करायचे; स्वत:चे अनुभव मांडायचे. प्रयोगानंतरदेखिल अनेकजणी स्वत: संपर्क ठेवायच्या - स्वत:च्या खासगी अनुभवांबद्दल विश्वासाने माझ्याशी बोलायच्या! कितीतरी जणींना हे नाटक आपल्या मनातलेच विचार समोर उलगडून दाखवतंय – असं वाटत असे. प्रेक्षक म्हणून नाटक पहायला आलेल्या अनेक जणींना या नाटकात काम करावेसे वाटत असे.
नाटकाची किंचितही जाहिरात न करतादेखिल नाटक महाराष्ट्रात खूपजणांपर्यंत पोचत गेले. लोकसत्ता, महानगर,प्रहार यासारख्या वर्तमानपत्रांनी नाटकाचे रकाने भरभरून कौतुक केले. हिंदुस्तान टाईम्स, मिड-डे, मिरर,टाईम-आऊट सारख्या इंग्लिश वृत्तपत्रांनी नाटकाची दखल घेतली. अनेक दिवाळी अंकांनी नाटका संदर्भात लेख लिहून घेतले. त्यामुळे सेवाभावी संस्थांच्या वर्तुळापलिकडे देखिल नाटकाचे नाव पोचायला लागले होते. हळूहळू त्यातूनच नाटक सादर करणाऱ्या आम्हा मंडळींचा आत्मविश्वास वाढत गेला. मराठी नाटकांचे प्रेक्षक आपले नाटक पहायला उत्सुक आहेत हे लक्षात येऊन मन सुखावून जात असे. आपल्या नाटकाचा प्रयोग नाट्यगृहामध्ये तिकिट लावून करण्याचे माझ्या केव्हापासून मनात घोळतच होते आणि एका दिवशी मूळ नाटकाच्या लेखिकेकडून - ईव्ह एन्सलर- कडून तशी परवानगी येऊन पोचली.
नेमकी त्याचवेळी ईव्ह एन्सलर मुंबईत येणार असल्याचे कळले. माझ्या नाटकाचा पहिला तिकिट असलेला प्रयोग होता त्याच दिवशी ती भेटणार होती- आनंद गगनात मावेनासा होणे म्हणजे काय- हे मी त्या दिवशी अनुभवले! मला आत्ता देखिल त्या आठवणीने माझ्या अंगावर सरसरून काटा आलाय! माझ्या एका मैत्रिणीने ईव्ह एन्सलरला माझी ओळख करून दिली – मराठी सारख्या स्थानिक भाषेत आपल्या नाटकाचा अनुवाद झालाय हे समजल्यावर तिने मला कडकडून मिठीच मारली. मराठीमध्ये “व्हजायना”ला काय म्हणतात ते विचारून घेतले आणि नाटकाच्या स्क्रिप्टवरती “योनी ब्लेसिंग्ज” असं लिहून सही करून दिली. मी तरंगत तरंगतच तिकिट असलेल्या पहिल्या प्रयोगासाठी नाट्यगृहात पोचले.
त्या दिवशी मुंबईत चक्री वादळ येणार असल्याची घबराट पसरली होती – अचानक पाऊस पडायला लागला होता – तरीदेखिल नाटकाला अनेक शूर प्रेक्षक हजर होते. “योनीच्या मनीच्या गुजगोष्टी” अशा बोल्ड नावाच्या नाटकालाही न घाबरता आले होते! आमच्या नाटकात कुणीही नावाजलेली अभिनेत्री नसताना, लेखिकेचं नावदेखिल ओळखिचं नसताना धैर्यने हे प्रेक्षक आमचं नाटक पहायला आले होते - मला त्या प्रेक्षकांचं मनापासून कौतुकच वाटलं!
खरंतर, आमच्या नाटकाला आलेल्या आणि न आलेल्याही सर्वच प्रेक्षकांचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. गेल्या काही वर्षात अनेक मराठी नाटकांना असहिष्णु प्रकारची वागणूक मिळालेली आहे. पण माझ्या नाटकात मात्र बाईच्या दृष्टीकोनातून केलेले उत्कट प्रणय, बलात्कार, हस्तमैथून, योनीवरचे केस, बाळाचा जन्म अशा योनीशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचे गमतीशीर पण गंभीर उल्लेख असूनही आजवर एकाही प्रयोगाच्या दरम्यान प्रेक्षकांमधून विरोधाचा सूर उमटलेला नाही. एकदा तर एका ’मान्यवर’ लेखकाने नाटकाविषयी “ओंगळ, किळसवाणं, गलिच्छ” अशा शब्दात वर्णन करणारा लेख लिहिला होता. पण त्यानंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम सकारात्मकच राहिला हे विशेष! अगदी ऑर्कुट सारख्या सोशलनेटवर्किंगच्या साईटवरती त्यानंतर भरपूर उलटसुलट चर्चा घडून आली होती. पण मोठ्या प्रमाणावर प्रेक्शक नाटकाच्या बाजूने उभे राहिले. अनेक अनोळखी व्यक्तींनी मला ई-मेल करून पाठिंबा कळवला -“तुम्ही असल्या टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका; तुम्ही उत्तम काम करता आहात- ते जरूर सुरू ठेवा!” असे नाटकाच्या प्रयोगांनंतर अनेक प्रेक्षक भेटून मला आवर्जून सांगायचे.
अजूनही प्रत्येक प्रयोगाला किमान दहा ते पंधरा प्रेक्षक आवर्जून भेटायला येतातच. रस्त्यात, ट्रेनमध्ये, बाजारात किंवा सणासमारंभाला देखिल अगदी अनोळखी माणसे येऊन भेटतात आणि “तुमचे नाटक बोल्ड आणि ब्यूटिफ़ुल आहे” म्हणून कौतुक करतात! नाटकाच्या विषयाचे, त्याच्या मांडणीचे, भाषेचे आणि सादरीकरणाचे त्यांना खूप कौतुक वाटते. महिलांना तर हे नाटक आपलेसे वाटतेच पण जेव्हा पुरुष प्रेक्षक येऊन सांगतात की – “हे नाटक इतके धीट विषयावर असले तरी जरासुद्धा अश्लील होत नाही ” तेव्हा आपणयोग्य पद्धतीने सादरीकरण करतोय- याची पोच मिळते!
स्त्री-पु्रुष समता ह्या विषयावर प्रशिक्षण देणारा माझा एक मित्र म्हणतो की - त्याला या नाटकाने अगदी आतून हलवून टाकले आहे. आपण स्वत:च्या लैंगिकतेचा देखिल किती वरवरचा विचार करीत होतो,याची नाटक पहाताना जाणीव झाली असेत्यला जाणवले! आणखी एका मित्राला वाटते की, हे नाटक पाहिल्यामुळे स्वत:च्या लैंगिकतेकडे डोळस पणे पाहण्याची प्रेरणा मिळेल आणि हे नाटक पाहिल्यानंतर पुरुष बायकांच्या शरीरबद्दल जे वेडंवाकडं बोलतात त्याला आळा बसेल.
हया नाटकाचा एखादा तरी प्रयोग फक्त पुरुषांसाठी ठेवावा असे अनेकजण सुचवतात. आता लवकरच पुण्याच्या सम्यक संस्थेतर्फे असा प्रयोग होणार आहे. ईव्ह एन्सलरने ज्या प्रमाणे जगभरातल्या दोनशे महिलांच्या मुलाखती घेऊन हे नाटक लिहिले तसा पुरुषांसोबत देखिल रिसर्च व्हावा आणि पुरुषांनाही अश्लीलतेच्या पलिकडे जाऊन सकारात्मक पद्धतीने स्वत:ची लैंगिकता व्यक्त करायची संधी मिळावी – असेही काहीजणांनी सुचवलेले आहे. अशा कामात प्रत्यक्ष कितीजण सहभागी होतात पाहू या! कदाचित येत्या वर्षभरात पुरुषांच्या लैंगिकतेविषयीसुद्धा असे काही नवे नाटक करून पाहता येईल आणि मला खात्री आहे की त्या नाटकाला देखिल असाच भरघोस प्रतिसाद मिळेल!
Thursday, July 29, 2010
Friday, July 16, 2010
"Breaking Silence, Voicing Concerns"
मी आज एक नवीन ब्लॉग सुरू करीत आहे. ब्लॉगचे नाव आहे "Breaking Silence"
"योनीच्या मनीच्या गुजगोष्टी"या माझ्या नाटकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळेच "Breaking Silence,Voicing Concerns" ह्या प्रकल्पाची कल्पना सुचली. नाटकाच्या प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांना आपले खासगी अनुभव, काळज्या आणि विचार माझ्याजवळ सांगावाश्या वाटत असत. प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चांना तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होताच; शिवाय अनेकजणी फोनवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून बोलत असत..... लैंगिकता या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयाबद्दल बोलायला लोकांना ‘जागा’ हवी असते - हेच यातून सिद्ध होत असे! अशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठीची जागा तयार करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून मी करीत आहे.
नुकताच या प्रकल्पाचा पहिला टप्पा मी पूर्ण केला आहे. त्यातील अनुभव आणि निरीक्षणे यांची देवाणघेवाण करण्यासाठी हा नवीन ब्लॉग मी सुरू केला आहे.
ह्या ब्लॉगवर आपले विचार, सूचना आणि अनुभव यांचे स्वागत आहे.
http://breakingsilence-vandana.blogspot.com/
Welcome to my new blog - "Breaking Silence" The blog is about my project "Breaking Silence, Voicing Concerns" This project is an experiment to evolve safe democratic spaces for dialogue about issues related sexuality. I have recently completed the first phase of the project. I will share my experiences in this project through this blog. This is a multilingual blog - Readers are most welcome to share their views and experiences in the language they are comfortable to express.
"योनीच्या मनीच्या गुजगोष्टी"या माझ्या नाटकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळेच "Breaking Silence,Voicing Concerns" ह्या प्रकल्पाची कल्पना सुचली. नाटकाच्या प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांना आपले खासगी अनुभव, काळज्या आणि विचार माझ्याजवळ सांगावाश्या वाटत असत. प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चांना तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होताच; शिवाय अनेकजणी फोनवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून बोलत असत..... लैंगिकता या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयाबद्दल बोलायला लोकांना ‘जागा’ हवी असते - हेच यातून सिद्ध होत असे! अशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठीची जागा तयार करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून मी करीत आहे.
नुकताच या प्रकल्पाचा पहिला टप्पा मी पूर्ण केला आहे. त्यातील अनुभव आणि निरीक्षणे यांची देवाणघेवाण करण्यासाठी हा नवीन ब्लॉग मी सुरू केला आहे.
ह्या ब्लॉगवर आपले विचार, सूचना आणि अनुभव यांचे स्वागत आहे.
http://breakingsilence-vandana.blogspot.com/
Welcome to my new blog - "Breaking Silence" The blog is about my project "Breaking Silence, Voicing Concerns" This project is an experiment to evolve safe democratic spaces for dialogue about issues related sexuality. I have recently completed the first phase of the project. I will share my experiences in this project through this blog. This is a multilingual blog - Readers are most welcome to share their views and experiences in the language they are comfortable to express.
Wednesday, June 30, 2010
‘अविस्मरणीय’
‘अविस्मरणीय’ असं विशेषण वापरता येईल असे अगदी मोजके क्षण मी अनुभवले आहेत!गेल्या आठवड्यात धारावीतल्या महिलांसाठी केलेला प्रयोग आणि त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पा - हे मला कधीच विसरता येणार नाहीत.....आमच्या संपूर्ण टीमसाठीच तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
दोनशे बायकांनी भरलेलं पु.ल.देशपांडे अॅकॅडमीचं मिनी थिएटर - साधारणपणे २० ते ५० वर्ष वयोगटातल्या कष्टकरी बायका आणि मुली - त्यातल्या बहुतेक जणींनी कधी नाट्यगृहात जाऊन नाटक कधी पाहिलेलंच नव्हतं..... धारावीच्या आतल्या भागांमधून त्या खास बसने नाटकाला आल्या होत्या... प्रयोगाआधीच्या त्यांच्या गलबल्यामधून त्यांची उत्सुकता आम्हा कलाकरांपर्यंत पोचत होती.... आपलं नाटक यांना समजेल की नाही , रुचेल की नाही याची आम्हाला देखिल काळजी होतीच.....नाटकाच्या सुरुवातीला आम्ही निवेदन करताना प्रेक्षकांना ‘योनी’ हा शब्द म्हणायला लावतो. . . तिथपासूनच सगळ्यांनी नाटकातल्या खट्याळपणाची मजा घ्यायला सुरुवात केली. आणि मग वाक्यागणिक येणारे उत्स्फूर्त हशे आणि टाळ्या ...यांच्या संगतीने प्रयोग रंगतच गेला.... कितीतरी ठिकाणी त्यांच्या अनावर हसण्यामुळे आम्हाला संवाद थांबवून ठेवावे लागत होते... काही वेळा तर पुढचा प्रवेश सुरू करेपर्यंत सुरू राहिलेल्या हशा आणि टाळ्यांमुळे दोन प्रवेशांमधे असलेलं संगीतदेखिल ऐकू येत नव्हते -
इतका उसळता प्रतिसाद इतक्या जवळून आम्ही कधीच अनुभवलेला नव्हता....मार्च मध्ये रवींद्र नाट्य मंदीरात आस्था परिवार संस्थेशी जोडलेल्या मंडळींसमोर प्रयोग झाला तेव्हा प्रोसिनिअम थिएटरमुळे प्रेक्षक आमच्या पासून तसे लांबच होते. पण आमच्या नाटकाची खरी मजा मीनी थिएटरमध्येच येते. एकेका प्रेक्षकाच्या डॊळ्यात पाहून श्वास- उच्छवासांसहित आपलं म्हणणं पोचवता येतं... ‘या हृदयीचे त्या हृदयी ’ म्हणतात तसं...प्रेक्षकांचे सगळे प्रतिसाद ही कलाकारांना नवी ऊर्जा देत रहातात... एकतर इतका इंटिमेट विषय आणि इंटिमेट ऑडिटोरिअम -आणि इतके उत्सुक प्रेक्षक -
प्रयोगानंतर अनेक जणींनी आम्हाला येऊन मिठ्या मारल्या- "आमच्या मनाच्या आतलंच तुम्ही स्टेजवरून बोलत होता- ते लई भारी वाटलं" इथून प्रतिक्रियांना सुरुवात झाली.... कुणाला बॅंडिट क्वीन सिनेमाची आठवण झाली होती तर कुणाला स्वत:च्या मुलीच्या बाळंतपणाची- हे नाटक खासकरून पुरुषांना दाखवायला पायजे - असं कुणी म्हणत होतं तर मधेच -नाटकाबद्दल मला बोलायचं आहे पण डोअरकीपर काकांना बाहेर जायला सांगा अशी एखादी विनंती येत होती....
नाटकात "चूत" या अपमानकारक शिवीसारख्या शब्दाला आम्ही नवे रूप देतो, त्यावर सगळ्याजणी खूष होत्या,काही जणींना तो शब्द म्हणायची लाज वाटत होती पण सुनीता लाजत लाजत जे म्हणाली ते मात्र सगळ्य़ांनाच पटलं - ती म्हणाली की इतकी वर्ष मी आपल्या त्या जागेकडे "शी,घाण" या दृष्टीनेच पाहिले होते; पण आजमुझे अपनी चूत पर नाझ है!- मग आणखी एक ताई उठून म्हणाल्या ‘ आजवर हा शब्द मी फक्त ऐकला होता पण आता मी हक्कने बोलणार आहे - चूत! ’ ह्या म्हणण्यावर एक जोरदार आरोळी आली- चूत की जय हो! आणि सगळं हॉल ह्या घोषणेने दणाणून गेला... चूत की जय हो! नाटकाचं सार त्यांनी किती थोडक्या शब्दात मांडलं ...आमच्या टीमला ही घोषणा आणि ती देणाऱ्या सगळ्याजणी फारच आवडल्या आहेत.... आता प्रत्येक प्रयोगाच्या आधी आम्ही देखील म्हणणार आहोत - चूत की जय हो!
दोनशे बायकांनी भरलेलं पु.ल.देशपांडे अॅकॅडमीचं मिनी थिएटर - साधारणपणे २० ते ५० वर्ष वयोगटातल्या कष्टकरी बायका आणि मुली - त्यातल्या बहुतेक जणींनी कधी नाट्यगृहात जाऊन नाटक कधी पाहिलेलंच नव्हतं..... धारावीच्या आतल्या भागांमधून त्या खास बसने नाटकाला आल्या होत्या... प्रयोगाआधीच्या त्यांच्या गलबल्यामधून त्यांची उत्सुकता आम्हा कलाकरांपर्यंत पोचत होती.... आपलं नाटक यांना समजेल की नाही , रुचेल की नाही याची आम्हाला देखिल काळजी होतीच.....नाटकाच्या सुरुवातीला आम्ही निवेदन करताना प्रेक्षकांना ‘योनी’ हा शब्द म्हणायला लावतो. . . तिथपासूनच सगळ्यांनी नाटकातल्या खट्याळपणाची मजा घ्यायला सुरुवात केली. आणि मग वाक्यागणिक येणारे उत्स्फूर्त हशे आणि टाळ्या ...यांच्या संगतीने प्रयोग रंगतच गेला.... कितीतरी ठिकाणी त्यांच्या अनावर हसण्यामुळे आम्हाला संवाद थांबवून ठेवावे लागत होते... काही वेळा तर पुढचा प्रवेश सुरू करेपर्यंत सुरू राहिलेल्या हशा आणि टाळ्यांमुळे दोन प्रवेशांमधे असलेलं संगीतदेखिल ऐकू येत नव्हते -
इतका उसळता प्रतिसाद इतक्या जवळून आम्ही कधीच अनुभवलेला नव्हता....मार्च मध्ये रवींद्र नाट्य मंदीरात आस्था परिवार संस्थेशी जोडलेल्या मंडळींसमोर प्रयोग झाला तेव्हा प्रोसिनिअम थिएटरमुळे प्रेक्षक आमच्या पासून तसे लांबच होते. पण आमच्या नाटकाची खरी मजा मीनी थिएटरमध्येच येते. एकेका प्रेक्षकाच्या डॊळ्यात पाहून श्वास- उच्छवासांसहित आपलं म्हणणं पोचवता येतं... ‘या हृदयीचे त्या हृदयी ’ म्हणतात तसं...प्रेक्षकांचे सगळे प्रतिसाद ही कलाकारांना नवी ऊर्जा देत रहातात... एकतर इतका इंटिमेट विषय आणि इंटिमेट ऑडिटोरिअम -आणि इतके उत्सुक प्रेक्षक -
प्रयोगानंतर अनेक जणींनी आम्हाला येऊन मिठ्या मारल्या- "आमच्या मनाच्या आतलंच तुम्ही स्टेजवरून बोलत होता- ते लई भारी वाटलं" इथून प्रतिक्रियांना सुरुवात झाली.... कुणाला बॅंडिट क्वीन सिनेमाची आठवण झाली होती तर कुणाला स्वत:च्या मुलीच्या बाळंतपणाची- हे नाटक खासकरून पुरुषांना दाखवायला पायजे - असं कुणी म्हणत होतं तर मधेच -नाटकाबद्दल मला बोलायचं आहे पण डोअरकीपर काकांना बाहेर जायला सांगा अशी एखादी विनंती येत होती....
नाटकात "चूत" या अपमानकारक शिवीसारख्या शब्दाला आम्ही नवे रूप देतो, त्यावर सगळ्याजणी खूष होत्या,काही जणींना तो शब्द म्हणायची लाज वाटत होती पण सुनीता लाजत लाजत जे म्हणाली ते मात्र सगळ्य़ांनाच पटलं - ती म्हणाली की इतकी वर्ष मी आपल्या त्या जागेकडे "शी,घाण" या दृष्टीनेच पाहिले होते; पण आजमुझे अपनी चूत पर नाझ है!- मग आणखी एक ताई उठून म्हणाल्या ‘ आजवर हा शब्द मी फक्त ऐकला होता पण आता मी हक्कने बोलणार आहे - चूत! ’ ह्या म्हणण्यावर एक जोरदार आरोळी आली- चूत की जय हो! आणि सगळं हॉल ह्या घोषणेने दणाणून गेला... चूत की जय हो! नाटकाचं सार त्यांनी किती थोडक्या शब्दात मांडलं ...आमच्या टीमला ही घोषणा आणि ती देणाऱ्या सगळ्याजणी फारच आवडल्या आहेत.... आता प्रत्येक प्रयोगाच्या आधी आम्ही देखील म्हणणार आहोत - चूत की जय हो!
-
अनेक महिन्यात ब्लॉग लिहिला नाही. . . काम मात्र भरपूर सुरू होते ; इतके की - जून नंतर नाटकाचे प्रयोग करायलाही वेळ मिळेनासा झाला. मागच्या महिन...
-
कणेकरांच्या आचरट लेखाला मी दिलेले उत्तर आवडल्याचे अनेक फोन्स आणि ई-मेल्स येताहेत. केवळ महाराष्ट्राच्याच कोनाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी अमेरीक...